2025-03-01
राज्यात प्राध्यापक भरतीस अखेर मान्यता, मुंबईसह १५ विद्यापीठांतील ६५९ पदे भरणार; भरतीप्रक्रियेची नवीन पद्धत कशी
maharashtra assistant professor recruitment 2025: आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाने उमेदवाराचा पूर्वानुभव, शैक्षणिक पात्रता, पब्लिकेशन, अध्यापन क्षमता आदींना ८० गुणांएवढे महत्त्व दिले आहे. तर मुलाखतीसाठी फक्त २० गुण दिले जातील. तसेच या दोन्हींचे मिळून १०० गुण होतील. त्यापैकी ५० गुण मिळवणारा उमेदवार पात्र ठरवला जाणार आहे. विशेष म्हणजे, मुलाखत प्रक्रिया झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करणे बंधनकारक असेल.
मुंबई विद्यापीठासह राज्यातील १५ अकृषिक विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी अखेर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ही पदभरती प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने व्हावी, असे राज्यपालांनी दिलेले निर्देश विचारात घेऊन निवडीच्या निकषांवरील भार बदलण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून, ही प्रक्रिया लवकर पार पडून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी तरी ही पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे.
राज्यातील १५ विद्यापीठांमध्ये प्राध्यापक व सहायक प्राध्यापक यांची एकूण १,१६६ पदे रिक्त आहेत. नियमानुसार विद्यापीठात मंजूर असलेल्या पदांच्या ८० टक्के पदसंख्या भरलेली असणे आवश्यक आहे. या सर्व विद्यापीठांमध्ये मिळून एकूण २,५३४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २,०२७ पदे भरलेली असणे आवश्यक असून सध्या १,३६८ पदेच भरलेली आहेत. त्यामुळे किमान ८० टक्के पदसंख्येसाठी अजून ६५९ पदे भरली जाणार आहेत. यात सर्वाधिक म्हणजे २११ रिक्त पदे मुंबई विद्यापीठात असून त्यापैकी १३६ पदे भरण्याची जाहिरात काढण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक पारदर्शकतेसाठी काही बदल केले आहेत.